महाराष्ट्रातील लोककला
महाराष्ट्रातील लोककला कोणत्या आहेत ? महाराष्ट्रातील लोककला कोणत्या ? या विषयी माहिती घेत असताना आपणाला लोककला म्हणजे काय ? इथून सुरुवात करावी लागेल परंतु त्याविषयी विस्तृत माहिती आपण पुढील लेखात घेऊ परंतु महाराष्ट्रात विधीनाट्य, भक्तिनाट्य, रंजनप्रधान नाट्य या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्रातील प्रयोगात्म लोककला कोणत्या आहेत ? याविषयी आपण माहिती घेऊया.
विधिनाट्य
1 गोंधळ
महाराष्ट्रात आदिमाया आदिशक्तीचा कुलधर्म कुलाचार विधी
म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. यामध्ये मुख्यतः
कदम राई आणि रेणूराई हे दोन गोंधळाचे प्रकार आहेत कदमराई गोंधळी आख्यानाचा गोंधळ
सादर करतात तर रेणुराई गोंधळी आरतीचा गोंधळ सादर करतात.
2 जागरण
ज्याप्रमाणे कुलदेवी म्हणून जगदंबा मातेला महाराष्ट्रात
स्थान आहे त्याच प्रमाणे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडोबाला तितकेच
महत्त्व आहे. खंडोबा या कुलदैवताच्या पूजा विधि म्हणून जागरण हे विधीनाट्य संपूर्ण
महाराष्ट्रात प्रचलित आहे. खंडोबाचे जागरण सादर करणाऱ्या पुरुष उपासकास वाघ्या तर
स्त्री उपासकास मुरळी असे म्हटले जाते.
लग्नाआधी गोंधळ आणि लग्नानंतर
जागरण घातले जाते.
3 भराड
ज्याप्रमाणे आदिमाया आदिशक्तीचा गोंधळ घातला जातो खंडोबाचे
जागरण घातले जाते तसेच ज्यांचे कुलदैवत भैरवनाथ आहे अशा भक्तां करवी भैरवनाथाचे
भराड हा कुलधर्म कुलाचार म्हणून सादर होत असतो. भराड हे नाथपंथी डवरी समाजातील कलावंतांकडून
सादर केले जाते.
वरील तिन्ही विधीनाट्यात पूर्वरंग आणि उत्तररंग
असतो पूर्वरंगात गण, देवता आवाहन, देवतेची स्तुतीपर गीते आणि उत्तररंगात नाट्यरूप
कथा सादर होते आणि त्यास अनुसरून कथात्म पदे गायली जातात.
4 बोहाडा
ग्रामदेवतेच्या उत्सव प्रसंगी केले जाणारे विधीनाट्य पालघर, नाशिक, खांदेश, विदर्भ, तसेच मराठवाडयातील काही भागात सादर होते. प्रांतपरत्वे याला आखाडी, चैती, पंचमी असेही म्हटले जाते. विविध देव देवतांचे मुखवटे धारण करून हे नृत्य नाट्य सादर होत असते.
भक्तिनाट्य
1 कीर्तन
बाराव्या-तेराव्या
शतकात संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली व नामसंकीर्तनपर सगुणभक्तीचे वारे
वाहू लागले, त्यात
महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीचे अपूर्व योगदान होते. भक्तिनाट्याचा उगम याच
कालखंडात झाला त्यातून
कीर्तन परंपरेचा उगम झाला. वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, संत
गाडगे बाबा संप्रदाय कीर्तन असे सदरीकरणाच्या अनुषंगाने कीर्तनाचे प्रकार आहेत.
2 लळित
लळितासारख्या
प्रयोगात्म लोकाविष्कारांचे स्वरूप दुपेडी असते. ‘तुज मज नाही भेद केला सहज विनोद’ असा संवाद भगवत
भक्तांनी ईश्वराशी केलेला असतो. ईश्वराच्या
संकीर्तनासोबत लळितात ईश्वराची सोंगे आणली जातात. गणपती, सरस्वती, ऋद्धी-सिद्धी या
सोंगासोबतच भालदार, चोपदार, छडीदार अशी ईश्वर-उपासकांची
सोंगे आणली जातात. गावगाड्यातील विविध जाती-पाती, त्यांचे व्यवसाय, त्या व्यवसायांतील
भल्याबुऱ्या गोष्टींचे दर्शनही लळितात होते. लळित हा भक्तिनाट्य प्रकार जवळ जवळ संपुष्टात आल्याचा
पाहावयास मिळतो.
3 भारुड
अनिष्ट रूढी, प्रथा परंपरा यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, समाजात सगुणभक्तिच्या
प्रचार प्रसारासाठी वारकरी संप्रदयातील संतांनी रुपकाश्रयी अभंगातून समाजाप्रबोधन
घडवून आणले. या संतांच्या रुपकाश्रयी अभंगातून समाजाप्रबोधन घडवण्याचे कार्य आज
अनेक भारुडकार आपल्या सादरीकरणातून करताना
दिसून येतात.
4 दशावतार
कोकणात दशावताराची परंपरा असून पूर्वरंगात संकासुर, भटजी, सूत्रधार, गणपती, ऋद्धी-सिद्धी अशी
पात्रे येतात. तर उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणांमधील आख्यान
रंगते. दशवताराचे आख्यान रंगताना आपणास एखाद्या पौराणिक संगीत नाटकाची आठवण होते.
दशावतारातील स्त्रीपात्रे पुरुषच सादर करतात. दशावतारातील
पेटारे, ज्यात वेगवेगळे
मखोटे घेऊन कोकणातील दशावतारी कलावंत जत्रांच्या म्हणजेच ग्रामोत्सवांच्या मोसमात
गावोगाव भटकंती करतात. बाबी नालंग, नाईक, मोचेमाडकर, वालावलकर, पार्सेकर, गोरे, आदी दशावतार
कंपन्यांनी या कलेला लोकमान्यता व राजमान्यता मिळवून दिलेली आहे.
5 नमन
शामजी नाईक काळे आणि शिवराम नाईक गोडबोले यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार
कोकणात आणला त्याचे दोन भाग झाले सिंधुदुर्गात
तो दशावतार आणि रत्नागिरीत तो नमन खेळे म्हणून प्रसिद्धी पावला. सादरीकरणाच्या
अंगाने नमन दशावतारापेक्षा थोडे वेगळे आहे परंतु शंकासुर हे पात्र दोन्ही नाट्यात
दिसून येते. नमन पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात सादर होते उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणांमधील आख्यान
रंगते.
6 चित्रकथी
कागदावरील चित्र दाखवून वीणा खडुक इ. वाद्यांच्या साथीने चित्रकथीकार कथा
सांगत असतो. हे कथागायन गीत, संवाद, निरूपण या माध्यमातून होत असते. चित्रकथी मध्ये पैठण
शैली आणि पिंगूळी शैली या दोन शैली आहेत. पैठण शैली काळाच्या ओघात नष्ट झाली असून
पिंगूळी शैली आजही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पिंगूळी या गावी
पाहावयास मिळते. गणपत म्हसगे आणि परशुराम गंगावणे हे दोन राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त कलावंत या ठिकाणी ही कला जोपासत आहेत. विशेष म्हणजे पिंगूळी या गावात चित्रकथी सोबत
कळसूत्री बाहुली, चामड्याच्या बाहुल्या, डोणागीत, राधा नाच, पांगुळ बैल या सारख्या
जवळ जवळ १२ लोककला प्रकारांचे जतन आणि संवर्धन होताना दिसून येते
7 कलगी तुरा
कलगी(शक्ति) श्रेष्ठ की
तुरा (शिव) श्रेष्ठ, माया श्रेष्ठ की ब्रम्ह श्रेष्ठ, प्रकृती श्रेष्ठ की पुरुष
श्रेष्ठ या आध्यात्मिक कूट प्रश्नाच्या शोधात कलगी तुरा या आध्यात्मिक पद्यमय कला
प्रकारचा उगम झाला. यात अनेक आध्यात्मिक कूट प्रश्न पद्य रचनेच्या माध्यमातून एक
पक्ष दुसऱ्या पक्षाला विचारत असतो. वरवर हा विसंवाद दिसत असला तरी शिव आणि शक्ति
हे भिन्न नसून एक आहेत हा सुसंवाद यातून साधला जातो. या आध्यात्मिक प्रश्नाच्या
शोधात अनेक कलगी पक्ष तुरा पक्षात अनेक शाहीरांचा उगम झाला, तमाशा, खडीगंमत, जाखडी
या लोककला प्रकारांच्या उगमाचे मूळ कलगी तुरा
या लोककला प्रकारात आहे. कलगी तुरा या प्रकारातून पोवाडा, राष्ट्रीय शाहीरी, सामाजिक
शाहीरी अशा शाहीरी परंपरेचा उगम झाला.
लोकनाट्य
1 तमाशा
महाराष्ट्रातील
सर्वात लोकप्रिय लोककला प्रकार म्हणजे तमाशा होय. लावणी या नृत्य प्रकाराचा उगम
तमाशा या लोकनाट्यातून झाला. तमाशात पूर्वरंगात गण, मुजरा, गौळण, रंगबाजी सादर
होते तर उत्तररंगात वग सादर होतो. गौळण या हाळीची, तक्रारीची विनवणीची, कृष्णाची ओळखीची गौळण अशा प्रकारच्या
गौळणी पूर्वरंगात सादर होत असतात.
2 दंडार
दंडार हा विदर्भातील झाडीपटीतील लोकनाट्य प्रकार आहे. विधीनाट्य-लोकनृत्य-लोकनाट्य
असे याचे स्वरूप बदलत गेले. दंडार या लोकनाट्याचे मूळ दंडार या आदिवासी नृत्यात आहे.
आंध, गोंड, कोलाम इ. आदिवासी जमाती मध्ये दंडार सादर केली जाते.
3 खडीगंमत
तमाशाचे विदर्भातील दुसरे रूप म्हणजेच खडीगंमत होय परंतु खडीगंमत मध्ये आजही स्त्री पात्र पुरुष कलावंतच
सादर करीत असतात. बुलढाणा ते गोंदिया पर्यंत खडीगंमतचे प्रयोग होताना दिसून येतात.
लोकसंस्कृतीचे उपासक
वरील लोककला प्रकारा व्यतिरिक्त
अनेक लोकसंस्कृतीच्या उपासका द्वारे महाराष्ट्राची लोकसंस्कृती बहरलेली दिसून येते.
ज्यामध्ये पिंगळा, वासुदेव, नंदीबैलवाला, पोतराज, भुत्या, जोगती-जोगतीण, स्मशाणजोगी,
बहुरूपी, जोशी, इ. लोकगीत-नृत्य-नाट्य परंपरा दिसून येते.
लोकगीत
स्त्री गीते – स्त्री गीतांमध्ये प्रामुख्याने
ओवीगीते, पाळणागीते, विविध सण उत्सवासंबधी गीते, लग्नगीते, अंगाई गीते, फुगडी गीते,
फुगडी गीते गात असताना विविध प्रकारच्या फुगड्या देखील खेळल्या जातात.
श्रमगीते – श्रम परिहार होण्यासाठी गायली जाणारी
गीते ज्यामध्ये भलरी गीते, मोटेवरची गाणी, या व्यतिरिक्त धनगरी ओवी गीते, कानबाईची
गाणी, विविध खेळगीते, आहेत. कोळी गीत नृत्याची खूप मोठी परंपरा महाराष्ट्राच्या समुद्र
किनाऱ्यावर वसलेल्या कोळी समाजात आहे.
आदिवासी लोकनृत्य-नाट्य
महाराष्ट्रातील आदिवासी नृत्य-नाट्य या मध्ये मादळ नृत्य-नाटय, तारपा नृत्य, ढोलनाच,
गौरी नाच, तुरथाळ नृत्य, घांगळी गायन, सुरथाळ गायन, डाकभक्ती, डेंगा नाच, होळी नृत्य,
डिंडण नाच, रेला नृत्य इ.
वरील विवेचन केलेल्या लेखात लोककला प्रकाराची थोडक्यात माहिती दिली आहे. प्रत्येक लोककला प्रकारावर विस्तृत माहिती देता येईल परंतु लेखन मर्यादा आहेत. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
कोई टिप्पणी नहीं:
If you have any doubts, Please let me know