भारतीय संस्कृति ही प्राचीन आणि पुरातन संस्कृती आहे. प्राचीन वेद, उपनिषद,
पुराणग्रंथ हे प्राचीन वाङ्मय मानल गेले आहे यामुळे हा वैदिक काळ म्हणून देखील
ओळखला जातो. आपण जर पाहिलं तर भारतीय संस्कृतीचे धागेदोरे अगदी वैदिक काळाच्या
अगोदर उत्खननातील भिंतीचीत्रांच्या माध्यमातून हाती लागलेले आहेत परंतु वैदिक
पूर्व साहित्य उपलब्ध नाही. वैदिक पूर्व कालखंडातील सुषिर वाद्य या संधर्भातील
माहिती आपल्याला मध्यप्रदेशात पंचमढी येथील गुहांमधील काढलेल्या भिंतीचीत्रांच्या
माध्यमातून मिळते. यामध्ये प्रामुख्याने तुर्य(तुतारी सारखे), अलगोजा, सनई यासारखी दिसणारी वाद्य
दिसतात. वैदिक वाङ्मयच्या आधारे आपण भारतातील प्राचीनकालीन सुषिर वाद्य या विषयी जाणून घेऊयात.
shankha | शंख |
शंख :
या वाद्याचा वैदिक काळापासून पुराणग्रंथात पुरेपूर उल्लेख आढळतो. समुद्री
जीवापासून या वाद्याची निर्मिती होते. समुद्र मंथनातून याची उत्पती झाल्याचा
संदर्भही पुराण ग्रंथात आढळतो. या वाद्याच्या ऊर्ध्व भागाला छोटेसे छिद्र पाडून
त्यामध्ये हवा फुंकून वाजवला जातो. शंख हा भारतीय संस्कृतीत एक सांस्कृतिक प्रतिक
म्हणून देखील मानला गेलेला आहे. हिंदू धर्मात शंखाला पवित्र स्थान आहे भगवान
विष्णूच्या हात देखील शंख विराजमान आहे. दक्षिनावर्ती आणि वामावर्ती असे शंखाचे
दोन प्रकारांचा उल्लेख आढळतो. अगदी पुराणकाळापासून शंखाचा उपयोग धार्मिक आणि युद्ध
कार्यात झालेला आढळतो. वाल्मिक ऋषींनी प्रहरांच्या समय सुचकते साठी शंखाचा उपयोग
केलेला आढळतो. पांचजन्य नामक राक्षसाचा वध भगवान विष्णूने केला तेंव्हा पासून
विष्णूच्या हातातील शंख पांचजन्य या नावाने ओळखला जाऊ लागला. महाभारत या
युद्धप्रधान काव्यात प्रत्येक योध्या जवळ शंख असल्याचा उल्लेख आहे ज्याचा उपयोग ते
विविध शंख वादनाच्या संकेतानुसार सैन्याच्या संचलनासाठी करत. भगवान श्री कृष्णा
कडील पांचजन्य या शंखा व्यतिरिक्त पाच पांडव यांनी धारण केलेल्या शंखांची नावे अर्जुना
कडील देवदत्त, भीमा कडील पौण्ड्र, युधिष्ठिराच्या हातात असलेला अनंतविजय, नकुल आणि
सहदेव यांनी धारण केलेले अनुक्रमे सुघोष आणि मणिपुष्पक अशा शंखांचा उल्लेख
महाभारतात आढळतो. हरिवंश पुराण या ग्रंथात शंखाला रणवाद्य म्हणून उल्लेख केलेला
आढळतो. भविष्यपर्वात ७७ व्या अध्यायात शंख आणि शंख निधी अशा दोन ऋषींच्या नावाचा
उल्लेख आलेला आहे यावरून असे सिद्ध होते कि, सुषिर वाद्याच्या नावावरून ऋषी
मुनीच्या नावाचे नामकरण केले जात असावे. भागवत पुराणात शंखचूड नावाच्या राक्षसाचा
उल्लेख आदळतो. अग्निपुराण आणि गरुड पुराण या दोन्ही पुराण ग्रंथांमध्ये शंखाच्या
महतीचे वर्णन केलेले आहे. रावण जेंव्हा सभेत येत असे
तर तत्पूर्वी विविध वाद्यांचे वादन होत असे त्या वाद्यांमध्ये शंखाचाही समावेश
होता या संदर्भात विवेचन रामायणात आढळते.
नाडी अथवा नाली :
नाडी या वाद्याचा सर्वप्रथम उल्लेख ऋग्वेदात आणि तद्नंतर अथर्ववेदात आढळतो.
नाडी वाद्य प्रामुख्याने हाडांपासून बनवत असल्याचा उल्लेख आहे . पाषाणयुगात
हाडांपासून बनवलेल्या वंशी चा विकास झालेला पहावयास मिळतो यात काही स्वररंध्रांची
स्थापना केलेली होती ज्यापासून विशिष्ट निश्चित केलेल्या धून वाजवता येतील. या
वाद्याचे वादन यमराजाला प्रसन्न करण्यासाठी होत असे असा उल्लेख ऋग्वेदात आहे. आपण
पाहतो कि यमराजाला प्रसन्न करण्यासाठी मृत व्यक्तींच्या पदार्थांचा उपयोग करतात
यामुळे नाडी वाद्याचे वादन यमराजाला प्रसन्न करण्यासाठी होत असावे याची शक्यता
नाकारता येत नाही. नाडी हे द्रविड संस्कृतीतील
वाद्य असल्याचे जाणवते कारण द्रविड संस्कृती ही वन्य जीवनाशी निगडीत आहे. जंगलातील
त्यांच्या सहवासामुळे मृत प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली आभुषणे, वाद्ये
प्रचलीत होती असे म्हणावयास काही हरकत नाही कारण आजही काही आदिवासी जमातींमध्ये
हाडांपासून बनविलेले आभूषण घालण्याचा आणि त्यापासून बनवलेल्या वाद्याचा वापर आपल्या
सण, उत्सव इ. प्रसंगाच्या वेळी वापरण्याची परंपरा आहे. डेन्मार्क येथे एका
उत्खननात साधारण: २५०० ते ३००० वर्षे
पूर्वीची वंशी सापडली आहे की जिची निर्मिती हाडांपासून झालेली आहे ती तेथील
संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. एथेल रोजेंथल या विदेशी अभ्यासकाच्या
एका विवेचनात अशी माहिती मिळते की, तिब्बेट हा प्राचीन भारताचाच एक भाग होता आणि
या प्रदेशात हाडांपासून बनवलेल्या वंशी पुरेपूर प्रचारात होती या प्रदेशातील
लोकांमध्ये या वादनाची परंपरा पूर्वी पासून संस्कारित झालेली पहावयास मिळते.
सांस्कृतिक सभ्यतेचा जस जसा विकास होत गेला तसा हाडांपासून बनवलेल्या या
वाद्याचे वादन घृणित वाटू लागले आणि त्याचे परिवर्तीत रूप प्राकृतिक सुरेल
वस्तूपासून बनवलेल्या वाद्यांमधून साकार होऊ लागले.
तुणव :
तुणव हे तुर्य वर्गीय सुषिर वाद्य प्राचीन काळात
प्रचलीत होते. तूणीर अथवा तुणव या वाद्याचे आधुनिक स्वरूप शिंग अथवा तुतारी, तुरही
या वाद्यात आढळते. या वाद्याचे स्वरूप कसे होते याबाबत वैदिक साहित्यात माहिती
मिळत नाही परंतु याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो तुणव वाद्याचे वादन वेणू सोबत
आणि वेणू सोबत नाडी वाद्य वादनाचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. एकंदरीत यावरून
असे स्पष्ट होते की तुणव हे तुर्य प्रकारातील वाद्य असून त्याचा वेगळा उल्लेख
वैदिक साहित्यात झालेला नसून बौध्द साहित्यात त्याचा उल्लेख झालेला आहे आणि हे
एकप्रकारे लोकवाद्य आहे असे म्हणावयास हरकत नाही.
वंशी/वंश:
आपल्या सुमधुर ध्वनी लहरींनी आपल्या
सभोवतालच वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणारे वंश सुषिर वाद्य अगदी
प्राचीन काळापासून प्रचलीत आहे आणि सर्व सुषिर वाद्यांमध्ये महत्वपूर्ण मानले गेले
आहे. प्राचीन कालीन साहित्यात वंश याला समानार्थी शब्द वेणु म्हणून वापरात आलेला
आहे कारण वंश बांबू पासून निर्मित असा त्याचा अर्थ होता. अथर्ववेद, तैतरीय संहिता,
काठक संहिता, शतपथ ब्राम्हण या मध्ये ‘वेणु’ शब्दाचा उपयोग आढळतो परंतु तो वंश या
अर्थी वापरला नसून बांबू पासून बनवलेला वंश या अर्थी आलेला आहे. वंश हा केवळ बांबू
पासून तयार होतो असे नाही तर तो खैर, हस्तिदंत, चंदन, रक्तचंदन, लोखंड, चांदी आणि
क्वचित प्रसंगी सोने यापासून देखील बनवला जात होता असे वर्णन शारंगदेव यांच्या
संगीत रत्नाकर या ग्रंथात आहे. वंश या वाद्याचे विस्तृत वर्णन भरतमुनींच्या
नाट्यशास्त्र या ग्रंथात आहे. वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार होणाऱ्या वंशी चे स्वरूप
मध्य्युगापासून मुरली, पावा, बासरी या वाद्यांत स्थिरावलेले पहावयास मिळते.
वर
उल्लेख केलेल्या वाद्यांव्यतिरिक्त गोमुख, खरमुख, पिरपिरी, तुणाइल, गोविषणिक, मुखमुइंग,
कर्कच ही देखील प्राचीन कालीन सुषिर वाद्य आहेत. यांचा उल्लेख बऱ्याच प्राचीन
ग्रंथांतून झाला आहे परंतु यांची आकृती अथवा वादन विधी यासंबंधी सांगोपांग चर्चा
कुठल्याच ग्रंथात नाही.
आपणास दिलेली माहिती
योग्य वाटल्यास निश्चितच आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
If you have any doubts, Please let me know